“कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकले अन्…” ; खासदार जया बच्चन यांचे वादग्रस्त विधान

Jaya Bachchan on KumbhMela stampede । मागच्या आठवड्यात मौनी अमावस्येला प्रगायराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली. मौनी अमावस्येच्या पवित्र मुहुर्तावर स्नान करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पण पहाटे तीनच्या दरम्यान अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. याच चेंगराचेंगरी विषयी आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दुषित Jaya Bachchan on KumbhMela stampede ।
प्रयागराजमधील चेंगराचेंगरीविषयी बोलताना जयाबच्चन यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी,”महाकुंभमेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदुषित झालं. आजही विचाराल की सर्वाधिक दुषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही. कुंभमेळ्यात जे काही घडलं त्याबद्दल कुणीही काहीही सफाई देत नाही. मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने ते पाणी दुषित झालं आहे. आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि उत्तरही तेच लोक देत आहेत. गरीब आणि कमजोर लोक यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत नाही. व्हिआयपी लोकांनाच ती ट्रिटमेंट मिळते. सामान्य लोकांसाठी काहीही व्यवस्था नाही. प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक आले हे तर धडधडीत खोटं आहे. इतके लोक येतीलच कसे जरा विचार करा” असे त्यांनी म्हटले आहे.
मृतदेह पाण्यात फेकले आणि…
जया बच्चन यांनी याविषयी पुढे बोलताना, मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दुषित झालं आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसंच पोहचत आहे. तसंच लोकांचं लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊ दिलं नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. आता भाजपा याच जलशक्तीवर भाषणं देत आहेत. असाही टोला जया बच्चन यांनी लगावला.
प्रयागराजमध्ये नेमकं काय घडलं? Jaya Bachchan on KumbhMela stampede ।
दरम्यान, प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला मागच्या आठवड्यातल्या बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. ‘मौनी अमावास्ये’साठी संगमावर प्रचंड गर्दी झालेली असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली. दुर्घटना घडून १२ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर, संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.





