Jay Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात जय पवार (Jay Pawar) यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. याशिवाय व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालावी, अशी मागणी देखील जय पवार यांनी केली आहे. अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच अजित पवार यांच्या अपघातावर जाहीर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटले की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. तसेच व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवारांचेही अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांनी त्या पुढे जात हे विमान मुद्दाम आदळवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. बारामतीला दृश्यमानता कमी होती तर विमान उतरवण्याच्या प्रयत्नच करायला नको होता. विमान मुंबईला परत नेता आले असते. विमानात इंधन मोठया प्रमाणात होते. या शिवाय इंधनाचे अनेक कॅन विमानात ठेवलेले होते. त्यामुळे हे विमान मुद्दाम आदळवण्यात आले आहे की काय असे आम्हाला वाटायला लागले आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.