पिंपरी | अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयावर जवाब दो आंदोलन

पिंपरी, (प्रतिनिधी) – गोरगरीब रुग्णांना पुरेसे धान्य मिळत नसल्याने छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने निगडी अन्न पुरवठा विभागाच्या अ व ज कार्यालयावर जवाब दो आंदोलन करण्यात आले. तसेच रेशनचा काळा बाजार थांबविण्याची मागणी करण्यात आली.
ई पॉस मशीन सर्वर मध्ये सतत होणाऱ्या बिघाडावर किंवा अति भारावर तोडगा काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कायमस्वरूपी मार्ग काढावा. प्रत्येक कार्ड धारकास ई पॉस मशीन प्रणालीद्वारे पावती देऊन, पावतीनुसार पूर्ण धान्य देण्याचे निर्देश स्वस्त धान्य दुकानदारास द्यावे.
कार्डधारकास (लाभधारकास) ई पॉस प्रणालीनुसार धान्य न देता, शासन निर्धारित लाभापेक्षा कमी धान्य देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना काळया यादीत टाकून त्यांचे परवाने कायमचे आणि त्वरित रद्द करावे. या मागणीसाठी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आले.
यावेळी धनाजी येळकर पाटील म्हणाले, शासनमान्य रेशन दुकानावरील धान्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी आणि वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी ई पॉस मशीन प्रणाली व्यवहारात आणली आहे. परंतु सर्व्हर वारंवार बंद पडत असल्यामुळे कार्डधारकांना धान्य वेळेत मिळत नाही.
मिळाले तरी पूर्ण लाभापेक्षा कमी धान्य देऊन दुकानदार कार्ड धारकाची फसवणूक करतात. दुकानदारामार्फत कार्डधारकाचा थम्ब घेतल्यानंतर त्यांना पावती दिली जात नाही. मागितली तरी उडवा उडवीची उत्तरे देत धान्य बंद करण्याची धमक्या देतात. निराधार नागरिकांना सुद्धा यातून सोडले जात नाहीत.
जनतेची अडवणूक करून फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी संघटनेच्या वतीने 9960126313 हा टोल फ्री नंबर जाहीर केला. फसवणुकीबाबत यावर कॉल करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, मौलाना अब्दुल गफार,युवती प्रदेश कार्याध्यक्ष किरण नाईकडे पाटील, जिल्हाध्यक्षा हेमलता लांडे पाटील,उपाध्यक्ष नीलम सांडभोर,विष्णू बिरादार,
संपर्कप्रमुख गणेश सरकटे, शहर उपाध्यक्ष विलास भोईने, महेंद्र शिंदे, महिला शहराध्यक्ष निशा काळे, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक शेख, गजानन बिरादार, मोहन अडसूळ, सचिन आल्हाट, वंचित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


