पुणे | स्वस्त धान्य वितरण रखडले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वत धान्य दुकानांमधील धान्य वितरणासाठी ई-पॉस यंत्रणेच्या सर्व्हर बिघाडामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागांतील सुमारे ५० टक्के धान्य वितरण रखडले आहे.
दि. २० जुलैपासून सर्व्हर डाउन असल्याने ई-पॉस यंत्रे चालत नाहीत. मागील आठवड्यात राज्य शासनाकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली. मात्र, अद्यापही यंत्र सुरू झालेली नाहीत. मुंबईत जास्त पाऊस असल्याने पाणी साचल्याने सर्व्हरला अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
पुणे शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिक दररोज धान्य घेण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, ई-पॉस चालत नसल्याने संबंधित लाभार्थींचा अंगठा घेत येत नाही, परिणामी धान्य देता येत नसल्याची स्थिती आहे.
अशी आहे वितरण स्थिती
पुणे : केशरी शिधापत्रिका धारक : सुमारे ४ लाख ६० लाख. लाभार्थी : सुमारे २० लाख
पिंपरी-चिंचवड : केशरी शिधापत्रिका धारक : 2 लाख ६५ हजार. लाभार्थी : सुमारे १० लाख
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या : 8 हजार ६२५
प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या : १२ लाख २६ हजार १७५
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने : ७६०




