Jason Gillespie | राजीनाम्यानंतर PCB वर संतापले जेसन गिलेस्पी, प्रशिक्षकपद सोडण्याचे खरे कारण केले उघड

Jason Gillespie resignation :- गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या जेसन गिलेस्पी यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने आकिब जावेद यांना अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. मायदेशी परातल्यानंतर पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन यांनी पीसीबीने मला पूर्ण अंधारात ठेवले असून त्यामुळेच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.
या वर्षांच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पांढऱ्या व लाल चेंडूसाठी स्वतंत्र प्रशिक्षकांची नेमणूक केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांना पांढऱ्या चेंडूंचे तर गिलेस्पी यांना लाल चेंडूचे प्रशिक्षक बनविण्यात आले होते. गॅरी कर्स्टन यांनी देखील तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पीसीबीने ऑस्ट्रेलियाच्या गिलेस्पी यांच्याकडे दोन्ही प्रकारच्या चेंडूचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. मात्र, कर्स्टन यांच्याप्रमाणेच गिलेस्पी यांनी देखील राजीनामा दिला आहे. तीन महिन्यांच्या काळात दोन्ही परदेशी प्रशिक्षकांनी राजीनामा दिला.
गिलेस्पी बोलताना म्हणाले, संवादाची कमतरता असल्याचे मला सातत्याने जाणवत होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपली आवश्यकाता आहे की नाही, याबाबतच मी साशंक होतो. आमच्या समोर आव्हाने होती हे मान्य केले तरी देखील मी काही तरी घडविण्याच्या उद्देश्यानेच तिकडे गेलो होतो, असे गिलेस्पीने एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले.
गिलेस्पी यांचे सहकारी असणारे टीम निल्सन यांना मुदतवाढ देण्यात आली नाही, याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा गिलेस्पी यांनी केला आहे. ते म्हणाले, टीम निल्सन यांना तुमच्या सेवांची आवश्यकता नसल्याचे सांगून पीसीबीने त्यांना मुदतवाढ दिली नाही. माझा सहकारी असून देखील मला या गोष्टींची कल्पना देण्यात आली नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळेच माझी पीसीबीला गरज नसल्याचे स्पष्ट झाल्याचे गिलेस्पी यांनी स्पष्ट केले.
पीसीबीचे कर्स्टन यांच्याशी मतभेद…
ऑक्टोबरमध्ये कर्स्टन यांच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे त्यांनी देखील राजीनामा दिला होता. कर्स्टन आणि पीसीबी यांच्यातील मतभेद राष्ट्रीय निवड समितीला संघ निवडण्याची जबाबदारी दिल्यानंतर समोर आले होते. मोहम्मद रिझवानला पाकिस्तानचा नवा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार बनवण्यात आला तेव्हाही प्रशिक्षक म्हणून कर्स्टनकडून कोणतीही माहिती घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्स्टनची भूमिका केवळ सामना विश्लेषकापुरतीच मर्यादित राहिली होती. साधारण हाच प्रकार गिलेप्सी यांच्या सोबतही झाला, म्हणूनच त्यांनी देखील राजीनामा दिला.



