Satara : कोरेगाव मतदारसंघात सोमवारपासून तीन ठिकाणी जनता दरबार

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्यांदा विजय मिळवल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी मतदारसंघातील कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोमवार, दि. 23 ते गुरुवार, दि. 26 या कालावधीत सातारा, खटाव आणि सातारारोड येथे जनता दरबारांचे आयोजन केले आहे. यावेळी प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपले प्रश्न या जनता दरबारांमध्ये उपस्थित करावेत, असे आवाहन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
सातारा तालुक्यातील गावांमधील जनतेसाठी सोमवारी (दि. 23) सकाळी 10.30 वाजता ना. महेश शिंदे यांच्या कार्यालयाशेजारी कृष्णानगर येथे जलसंपदा विभागाच्या करमणूक केंद्रात (इरिगेशन हॉल) दरबार होणार आहे. खटाव तालुक्यातील गावांमधील जनतेसाठी मंगळवारी (दि. 24) सकाळी 10.30 वाजता खटाव येथे, तर कोरेगाव तालुक्यातील गावांमधील जनतेसाठी गुरुवारी (दि. 26) सकाळी 10.30 वाजता सातारारोड येथील यशोदीप मंगल कार्यालयात जनता दरबार होणार आहे.
या जनता दरबारात प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, भारत संचार निगम लिमिटेडचे उपकार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता, शासकीय, निमशासकीय विभागांचे प्रमुख सर्वसामान्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणार आहेत. स्वतः ना. महेश शिंदे हे या जनता दरबारांना उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडवणार आहेत.





