पुणे जिल्हा | जानाई देवी मंदिर पूर्णत्वाकडे ; अंतर्गत बांधकामाचे भूमिपूजन

जेजुरी, (वार्ताहर) – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाई देवी मंदिराचा गाभारा व उर्वरित बांधकामाचे भूमिपूजन श्री मार्तंड देवसंस्थान, पालखी सोहळा समिती, जानाई देवी जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
श्री जानाई देवी हे जेजुरीकर नागरिक व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी जानाई देवीच्या मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून सुरू करण्यात आले. या मंदिराच्या बांधकामासाठी चार कोटी रुपये अपेक्षित असून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने या मंदिरासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
उर्वरित निधी ग्रामस्थ व भाविकांनी दिला आहे. या मंदिराचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी देवसंस्थानच्या वतीने सुमारे 72 लाख निधी उपलब्ध करून दिला आहे.
उर्वरित मंदिराचे गाभारा, शिखर, अंतर्गत कामांचे भूमिपूजन श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ, जानाई देवी जीर्णोद्धार समिती सदस्य, श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले. ग्रामदैवता जानाई देवी मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने जानाई भक्तांच्यात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, पोपट खोमणे, अभिजित देवकाते, विश्वास पानसे तसेच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी कृष्णा कुदळे,
छबन कुदळे, जानाई देवी, जीर्णोद्धार समितीचे सुधीर गोडसे, रामचंद्र भापकर, माणिक पवार, पंडित हरपळे, रवींद्र नवगिरे, गणेश आगलावे, आर्किटेक्चर प्रशांत नाझरेकर ,राजेंद्र पेशवे, नागनाथ झगडे,तसेच सचिन पेशवे, माऊली खोमणे, रोहिदास माळवदकर, गिरीष झगडे, दीपक राऊत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





