दहशतवादी अफजल गुरुचा भाऊ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षानंतर विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्षसुद्धा निवडणूक लढवताना दिसणार आहेत. बंदी असलेल्या जमात-ए-इस्लामीपासून इंजिनिअर रशिद याच्या अवामी इत्तेहाद पार्टीपर्यंत अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि फुटीरतावादी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवताना दिसणार आहेत.
या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती सोपोर विधानसभा मतदारसंघाची. याला कारणदेखील तसेच आहे या मतदारसंघातून संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचा भाऊ एजाज गुरू अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. बारामुल्ला येथील डेलिना येथील रहिवासी असलेल्या इजाज याने सोपोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
का लढवत आहे निवडणूक?
मी भावाच्या नावावर मते मागणार नाही. माझी विचारधारा माझ्या भावाच्या विचारसरणीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. माझा मुलगा शोएब इजाज गुरु याला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक केली. यामुळे आपण निवडणूक लढवत असल्याचे एजाज गुरूने म्हंटले आहे.
कोण आहे एजाज गुरु?
एजाज गुरू हा संसदेवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरलेला अफजल गुरू याचा भाऊ आहे. संसद हल्ल्यात दोषी ठरल्यानंतर 2013 मध्ये अफजल याला फाशी देण्यात आली होती. 58 वर्षीय एजाज गुरु हा नववी पास आहे. त्याने पशुसंवर्धन विभागातही काम केले आहे. नोकरीतून व्हीआरएस घेऊन ठेकेदारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या माहितीनुसार, एजाज गुरु याच्याकडे 50 लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच आठ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्याच्या नावावर सहा लाख रुपयांचे बँकेचे कर्ज आहे. त्याच्या पत्नीकडे तीन लाखांची संपत्ती आहे.





