Jammu-Kashmir : इंडियन आर्मीने लगेच बदला घेतला.! CRPF तुकडीवर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडसह २ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
सोमवारी सुरक्षा दलांनी संशयित परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीत लतीफ भट्टसह त्याच्या एका साथीदाराचा खात्मा झाल्याचे वृत्त विविध वृत्तसंस्थांनी दिले आहे.

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा मोठी मोहीम उघडली असून, कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट्ट याचाही या कारवाईत मृत्यू झाला आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून फरार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात घेराव घातला होता. अखेर सोमवारी (१६ नोव्हेंबर) ही शोधमोहीम चकमकीत रूपांतरित झाली.
नेमकी कुठे आणि कशी झाली कारवाई?
कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार परिसरातील अकहरन भागात ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४६ व्या बटालियनचे तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर होती. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर जवळच्या झाडाझुडपांचा आणि जंगल परिसराचा आधार घेत पसार झाले होते.
#WATCH | J&K: Visuals from the spot after an encounter between Kashmir police and terrorists in Kulgam.
(Visuals from the area, deferred by unspecified time; no live operational details disclosed) https://t.co/JyDAaleCFe
— ANI (@ANI) November 16, 2026
या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. परिसरातील संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात येत होती. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेटवर्कचाही तपास सुरू होता.
दरम्यान, दहशतवादी कुलगाम परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. त्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम तीव्र केली. सोमवारी सुरक्षा दलांनी संशयित परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीत लतीफ भट्टसह त्याच्या एका साथीदाराचा खात्मा झाल्याचे वृत्त विविध वृत्तसंस्थांनी दिले आहे.
कोण होता लतीफ भट्ट?
मोहम्मद लतीफ भट्ट हा कुलगामचा रहिवासी असून, त्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय होता. दक्षिण काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून तो आपले नेटवर्क सक्रिय ठेवत असल्याची माहिती समोर आली होती.
११ नोव्हेंबरला नेमकं काय घडलं होतं?
११ नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील अकहरन परिसरात सीआरपीएफच्या सुरक्षा चौकीवर हल्ला झाला होता. दोन सशस्त्र हल्लेखोरांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंह, कॉन्स्टेबल राकेश दास आणि कॉन्स्टेबल संतोष चंद्रू हे तीन जवान जखमी झाले होते.






