Jamkhed News : तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने आरंभ फाउंडेशनच्या फलकाचे पूजन

जामखेड : गेल्या तीन वर्षांपासून समाजसेवेच्या व्रताला वाहून घेतलेल्या आरंभ फाऊंडेशनने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या उपक्रमांमधून अनेकांच्या आयुष्याला उभारी देण्यात फाऊंडेशनला खारीचा वाटा उचलता आला असून, याचे मोठे समाधान आहे, असे प्रतिपादन फाऊंडेशनचे संस्थापक ऍड. ऋषिकेश डूचे यांनी केले. सर्व जाती-धर्मांचे लोक उत्स्फूर्तपणे फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी होत असून, त्यांच्याकडून मिळणारी प्रशंसा आणि पाठिंबा यामुळे नव्या जोमाने आणि हुरूपाने समाजकार्य पुढे नेण्यास प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जामखेड शहरातील कोर्ट रोडवरील आरंभ फाऊंडेशनच्या कार्यालयात फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी फाऊंडेशनच्या फलकाचे पूजन ऍड. ऋषिकेश डूचे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार ओंकार दळवी, पत्रकार समीर शेख, चेतन राळेभात, अशोक हुलगुंडे, विक्रम जमदाडे, संजय फुटाणे, अमर चाऊस, ऋषिकेश ओझर्डे, विकास वाघमारे, रवी बोधले, भरत आटोळे, मयूर भोसले, चिन्मय राजगुरू, वेदांत दळवी, विशाल लोळगे यांच्यासह फाऊंडेशनचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
आरंभ फाऊंडेशनने गेल्या तीन वर्षांत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत विविध उपक्रम राबवले आहेत. वर्षभरात रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरजूंना मदत यांसारख्या अनेक समाजोपयोगी कार्यांमधून फाऊंडेशनने आपली ओळख निर्माण केली आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक समाजात सकारात्मक बदल घडवण्यास हातभार लागला आहे. “फाऊंडेशनच्या कार्याला मिळणारा लोकांचा पाठिंबा आणि सहभाग आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देतो. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ऍड. डूचे यांनी यावेळी सांगितले.
हा वर्धापन दिन समारंभ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी एकजुटीचे आणि नव्या संकल्पांचे प्रतीक ठरला. यापुढेही आरंभ फाऊंडेशन समाजसेवेच्या क्षेत्रात आपले योगदान देत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





