Jamkhed News : जामखेडमध्ये श्रीनागेश्वर पालखी सोहळा उत्साहात संपन्न

जामखेड : जामखेड येथे मंगळवारी श्रीनागेश्वर पालखी सोहळा टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि वारकरी परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. नागपंचमीच्या निमित्ताने गेल्या २२ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या सोहळ्यात यंदा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शुद्ध वारकरी परंपरेनुसार हा पालखी सोहळा संपन्न झाला.
महापूजा आणि पालखी प्रस्थान
सकाळी जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिरात यजमान तथा पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजने सादर केली. “तुम्ही विश्वनाथ दीन रंक, मी अनाथ” या महादेवाच्या अभंगासह पालखीचे प्रस्थान झाले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते पालखीमध्ये मुखवटा स्थापन करण्यात आला. “हरहर महादेव, ओम नमः शिवाय, नागेश्वराय शिव नागेश्वराय, ज्ञानोबा तुकाराम”च्या जयघोषात आणि भजनी मंडळांच्या टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.
पालखी मिरवणुकीचा मार्ग
श्रीनागेश्वर मंदिरापासून सुरू झालेली पालखी मिरवणूक खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली, आणि लक्ष्मी चौक मार्गे वैतरणा नदीच्या तीरावरील नव्याने तयार केलेल्या पालखी मार्गावरून पुन्हा श्रीनागेश्वर मंदिरात पोहोचली. कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर “संत भार पंढरीत” हा अभंग घेण्यात आला आणि सांगता आरतीने सोहळ्याची समाप्ती झाली.
भजनी मंडळांचा सहभाग
या सोहळ्यात विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बोराटे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील इतर भजनी मंडळांनी सहभाग घेतला. शहरात ठिकठिकाणी भक्तांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर महिलांनी दिंडी मार्गावर सडा-रांगोळी सजवून भक्तिमय वातावरणाला चार चाँद लावले.
नाम सप्ताह आणि कीर्तन
या उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या नाम सप्ताहात मंगळवारी रात्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज देहुकर यांचे कीर्तन झाले. गुरुवारी (दि. ३१ जुलै २०२५) सकाळी १० ते १२ या वेळेत चेतन महाराज बोरसे (मालेगाव) यांचे कारल्याचे कीर्तन होणार असून, महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल.
उपस्थित मान्यवर आणि सेवा मंडळ
सोहळ्याला प्रा. मधुकर राळेभात, प्रा. ज्ञानदेव कुंभार, गणेश डोंगरे, संजीवन मेंढकर, शिवनेरीचे कॅप्टन भोरे, पांडूराजे भोसले, संजय काशीद, दिगंबर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीपकुमार राजगुरू, महादेव पानसाडे, सिताराम राळेभात, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, श्याम शिरसागर, किरण सोनवणे, नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे यांनी उत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
भक्तिमय जामखेड
या पालखी सोहळ्याने संपूर्ण जामखेड शहर भक्तिमय झाले. भक्तांनी पालखी दर्शनासाठी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला, तर श्रीनागेश्वर सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





