Jamkhed Municipal Council : उद्याचा जामखेडचा नगराध्यक्ष कोण? उत्सुकुता शिगेला..!

जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी राहिलेल्या दोन प्रभागाचे आज मतदान झाले असून . उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी जामखेडचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने कोणता उमेदवार विजयी होईल, या चर्चाचे फड मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत चौका-चौकात रंगले होते. गेल्या नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये झालेल्या राजकीय स्थित्यंतरामध्ये जुळलेली नवीन राजकीय समीकरणे आणि मतदानाचा वाढलेला टक्का याच्यातून मतदाराचा कौल नेमका कोणाच्या बाजूने राहणार? याची उत्सुकता आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये नगरसेवकपदाच्या २१ प्रभागातील २१ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या वेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तिरंगी झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली होती. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. या वेळी झालेल्या निवडणुकीमध्ये नगरपरिषदेची नवीन प्रभागरचना झाली आणि नगरसेवक, प्रभागांची संख्या वाढली आहे.
त्यातून, १२ प्रभागातून २४ नगरसेवकांची निवड होणार आहे. नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून, अनेक राजकीय स्थित्यंतरे आणि पक्षांतरे झाली. त्यामधून नवी राजकीय समीकरणे जुळली आहेत. या वेळची निवडणूक भाजप ,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) राष्ट्रवादी (अजित पवार गट ) शिवसेना एकनाथ शिंदे गट,अशी लढत झाली. मतदानाचाही टक्काही वाढला आहे. त्यामुळे पालिकेमध्ये मतदार राजाचा कौल भाजप दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना यापैकी नेमका कोणाच्या बाजूने राहणार? याची उत्सुकता आहे.
नगर परिषदांच्या दोन प्रभागातील निवडणुका पुढे ढकलल्याने न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने मतमोजणी पुढे ढकलल्याने येथील मतदारांची उत्सुकता २१ डिसेंबरपर्यंत ताणली गेली आहे. जामखेडमध्ये भाजप ,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) राष्ट्रवादी (अजित पवार गट ) शिवसेना एकनाथ शिंदे गट,हे चार पक्षात ‘काँटे की टक्कर’ झाली असून येथे प्रमुख दावेदार असल्याने निवडणूक काळात प्रचारात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.
दोन प्रभागाचे सायंकाळी मतदान संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे दावे केले. मतदारराजाने नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे मतपेटीत बंद झाले असले तरी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बराचवेळ झालेल्या मतदानाची आकडेमोड करीत विजयाचे गणित बांधत होते. सर्वसामान्य जनतेलाही या निवडणुकीविषयी कुतूहल असून, नेमके निवडणूक निकालात काय होईल, याची उत्सुकता आहे.
यावर्षीची निवडणूक गाजली ती पैशांच्या वाटपामुळे. सर्वच राजकीय पक्षांनी एका मताला हजारोंच्या रकमेचे वाटप केले. या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदाराला राजकीय पक्षांकडून जे पैशाचे प्रलोभन दाखवण्यात आले, त्यांचे आकडे हजारोंच्या घरात आहेत. मतदारांनीही संधी सोडली नाही. जो पक्ष पैसे घेऊन येईल, त्या सर्वांकडून पैसे घेतले. दारात आलेले पैसे नाकारले, तर उगाचच संशय येईल, या भीतीने मतदारांनी सर्वांकडून पैसे घेतले व आपल्याला योग्य उमेदवार वाटेल, त्यालाच मतदान केल्याचे मतदार खासगीत बोलत होते.





