जामखेड – शहरातील नाल्या तुडूंब; सर्वत्र कचऱ्याचे ढीग

जामखेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात असताना जामखेड शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.
शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून मोठा निधीही खर्च होतो. परंतु, शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली, तर स्वच्छता नक्की होते कुठं, असा प्रश्न पडतो. लाखो रुपयांचा चुराडा होऊनही स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.
मात्र, अलीकडच्या काळात नगर परिषद प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडला की काय असे वाटायला लागले आहे. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत “एक तारीख- एक तास’ उपक्रमाच्या अनुषंगाने स्वच्छता मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, शहराची परिस्थिती पाहता स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. नगरपरिषदेकडून महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करूनही शहरातील अनेक भागात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.
नियमित येणारी घंटागाडी तीन-चार दिवसांतून एकदाच येते. मुख्य रस्ते सोडल्यास अनेक अंतर्गत आणि विस्तारित रस्त्यालगतच्या गटारी तुंबलेल्या असतात. स्वच्छतेच्या ठेक्यासाठी वर्षाला लाखोंचा खर्च होत आहे. मात्र, नागरिकाची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र याचे फलित काहीच नसल्याचे दिसून येत आहे.
सुनंदाताईंच्या स्वप्नाला नगरपरिषदेकडून खो!
आ. रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यादेखील अनेक उपक्रमांतून आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातून विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. पवार कर्जत व जामखेड शहरात स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. कर्जतमध्ये त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, जामखेडमध्ये त्यांच्या आवाहनाला ना नागरिकांकडून प्रतिसाद मिळतोय ना जामखेड नगरपरिषदेकडून! त्यामुळे एकप्रकारे पवार यांच्या स्वच्छ जामखेडच्या स्वप्नाला जामखेड नगरपरिषदेनेच खो दिला आहे.




