जामखेड: चेतना सेवा संस्थेच्या ‘त्या’ महाविद्यालयाची चौकशी होणार; तंत्रशिक्षण मंडळाची सात सदस्यीय समिती गठीत

जामखेड : साकत (ता. जामखेड) येथील चेतना सेवा संस्था (लातूर) संचालित नर्सिंग, फार्मसी आणि पॉलिटेक्निक कॉलेजवर विविध गंभीर तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला १७ जुलैपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संस्थेविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये साळवे यांनी संस्थेकडून एकाच इमारतीत तीन वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू करून शासनाची फसवणूक केल्याचा, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न शिकवता फक्त कागदोपत्री दाखवून शिष्यवृत्ती रक्कम लाटल्याचा आरोप केला आहे.
याशिवाय संस्थेमध्ये प्रत्यक्ष शिक्षक नसताना कागदोपत्री शिक्षकांची नावे दाखवली जात असल्याचा आणि तपासणीसाठी येणाऱ्या समित्यांना लाच देऊन नियमबाह्य बाबी लपवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ यांनी सात सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून, संस्थेने शासनाच्या MSBTE, PCI व AICTE या नियामक संस्थांच्या नियमांनुसार स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारल्या आहेत की नाही, याचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
या समितीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. आगरकर (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर) असतील. समितीचे इतर सदस्य म्हणजे डॉ. के. पी. पवार, डॉ. एस. एस. हरीप (शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर), डॉ. मिलिंद वाघ (कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक), डॉ. रिझवान शेख (प्राचार्य, डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, नाशिक), एस. एस. दिक्षीत (अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक) आदींचा समावेश आहे.
दरम्यान, संबंधित संस्थेविरोधात कोणतीही कार्यवाही न झाल्यास १७ जुलै रोजी अहील्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही साळवे यांनी दिला आहे.
भाजप युवा मोर्चाचाही इशारा –
सदर महाविद्यालयांवर बनावट कागदपत्रे, अपात्र कर्मचारी आणि शिष्यवृत्ती गैरव्यवहाराचे गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष गव्हाळे यांनी केले आहेत. तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात, डॉ. पल्लवी एस. सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (B.Sc व GNM), इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज यांना खोट्या कागदपत्रांद्वारे मान्यता मिळवल्याचा दावा आहे.
या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षक वर्ग नसून, तपासणीवेळी कागदोपत्री कर्मचारी दाखवले जातात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गैरवापर आणि लाचखोरीद्वारे मान्यता मिळवल्याचा आरोप आहे. गव्हाळे यांनी तात्काळ तपासणी, मान्यता रद्द, विद्यार्थ्यांचे समायोजन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तपासणी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनावर ५०-६० नागरिकांच्या सह्या आहेत.





