जामगाव रस्त्यावर वाहने होताहेत खिळखिळे; प्रवाशांना पाठदुखी, मणक्यांचे आजार

पारनेर – पारनेर ते जामगाव या डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कोणता खड्डा चुकवावा, अशी कठीण परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. पारनेरपासून पुढे जामगावकडे जाताना कमीत कमी पन्नास ते साठ छोटे मोठे खोल खड्डे पडले आहेत. या दुरवस्था झालेल्या खड्डेना लवकरात लवकर बुजवण्याची मागणी पारनेर जामगाव मार्गे दैनंदिन प्रवास करणारे सजग नागरिक करत आहेत.
पारनेर ते भाळवणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या भरपूर आहे. पण या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. पारनेरकडून जाताना खोडदे वस्तीपासून ते डिकसळ माथ्यावर हॉटेल सुयेशपर्यंत जागोजागी अक्षरशः डांबरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून कमीत कमी पन्नास ते साठ छोटे मोठे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोज हाडे मोकळी होत आहेत तर त्यांना मणक्यांचे व पाठदुखीचे आजार जडले आहेत.
खड्ड्यांमुळे वाहने देखील खिळखिळे झाले आहेत. या रस्त्यावरून व्हालवासारखे अवजड वाहने जात असल्याने या रस्त्यावरून खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाला या रस्त्याची डागडुजी करण्याची मानसिकता दिसत नाही. डिकसळ फाट्याचे अलिकडे एका ओढ्याच्या वळणावर तर दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी अनेक प्रवाश्यांना जखमी केले आहे.
संबंधित ठेकेदार डागडुजी करतांना थातुरमातुर कामे करीत असल्याने काही दिवसातच रस्ता झिगजाग बनत आहे. या खड्ड्यामध्ये पाऊसाचे पाणी साचले तर रस्त्याचा अंदाज येत नाही आणि अचानक गाडी या खड्ड्यामध्ये जाऊन प्रवाशी जखमी होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.





