ढाका : देशव्यापी आंदोलनानंतर बांगलादेशने गुरुवारी जमात-ए-इस्लामी बांगलादेश आणि तिची विद्यार्थी शाखा इस्लामी छात्र शिबीर यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातली. जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी पक्षाने सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेने माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा प्रमुख मित्र असलेल्या इस्लामी पक्षावर बंदीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जमात-शिबीर आणि बीएनपीने विद्यार्थ्यांचा फक्त ढाल म्हणून वापर केला, असे पंतप्रधान शेख हसिना यांनी गुरुवारी इटालियन राजदूत अँटोनियो ऍलेसँड्रो यांच्याशी बोलताना सांगितले. ऍलेसँड्रो यांनी हसिना यांच्या गणभवन या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. बांगलादेश सरकारने मंगळवारी सरकारी नोकऱ्यांमधील कोट्यांबाबत विद्यार्थ्यांच्या घातक देशव्यापी आंदोलनामध्ये किमान १५० लोक मरण पावले होते.
त्यानंतर जमात-ए-इस्लामीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. जमात-ए-इस्लामीने या चळवळीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप सरकारने केला. या आठवड्याच्या सुरुवातीला सत्ताधारी अवामी लीगच्या नेतृत्वाखालील १४ पक्षीय आघाडीच्या बैठकीत जमातला राजकारणातून बंदी घातली जावी असा ठराव मंजूर झाल्यानंतर हा निर्णय झाला आहे.