Jalna Gas Cylinder: आता थेट गॅस सिलेंडरची चोरी; जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले
Jalna Gas Cylinder: रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल 110 गॅस सिलिंडरची मोठी चोरी

Jalna Gas Cylinder: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम भारतातही जाणवत आहे. विशेषतः घरगुती एलपीजी सिलेंडर मिळण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता जालनात गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना घडली आहे.
जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल 110 गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी गॅस एजन्सी बंद असताना मध्यरात्री ही चोरी झाल्याची शक्यता आहे.
चोरीस गेलेल्या सिलिंडरची अंदाजे किंमत साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. सध्या पोलिसांकडून या चोरीचा अधिक तपास सुरू आहे.
सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
दरम्यान, एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅस एजन्सी, वितरण कर्मचारी आणि सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी गॅस वितरकांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गॅस एजन्सी, वितरण कर्मचारी तसेच सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Jalna Gas Cylinder
यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक जारी केले असून गॅस पुरवठा पूर्ववत होईपर्यंत हे धोरण लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या प्रशासन आणि सरकारसमोर गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा:
Eknath Shinde : मोठी बातमी! अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; कारण काय?






