जालना अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत ; जखमींवर मोफत उपचार होणार

Jalna Accident । पंढरपूर येथून दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना राजूरकडे घेऊन जाणाऱ्या काळीपिवळी जीप विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात ७ जणांचा बुडून मृत्यू झालाय. दरम्यान, अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच या अपघातात जखमी असलेल्या सर्वांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली.
अपघातात ७ जणांचा बुडून मृत्यू Jalna Accident ।
जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ प्रवासी काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने 7 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील भाविक पंढरपूरच्या वारीवरुन आले होते. आपल्या गावाकडे जात असताना राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले Jalna Accident ।
पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली. यावेळी जालनावरून राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये समोरून दुचाकीस्वार आल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही जीप थेट विहिरीत कोसळली. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं. मात्र या घटनेत इतर 7 जणांचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत चालक बचावला असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. याशिवाय मयताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देखील सरकारने जाहीर केली. याशिवाय जखमींवरती मोफत उपचार देखील केले जाणार आहेत.





