जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरखेडे गावात शेतातील कुंपणात इलेक्ट्रिक करंट सोडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कुंपणानेच मजूर आणि त्याच्या कुटुंबाचा घात केला. या कुंपणात इलेक्ट्रिक करंट सोडण्यात आला होता. त्याची माहिती मजुराला न दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरखेडे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. मजुरांना या वीज प्रवाहाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना त्या तारेच्या कुंपणाचा स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना नेमकी कधी घडली, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात, मात्र अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या उपायांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या घटनेमुळे शेतात अशा प्रकारे वीज प्रवाह सोडणे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.