रावेर: रावेर तालुक्यातील मुजलवाडी, लोहारा आणि कुसुंबा गावांमध्ये जडीबुटी विक्री करणाऱ्या दोन साधूंना मुलं चोरण्याच्या संशयावरून जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हरियाणाहून आलेल्या या साधूंना मारहाण करत त्यांची चारचाकी गाडीही फोडण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. नेमकं काय घडलं? हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील रहिवासी असलेले साधू जस्सानाथ पुनुनाथ (वय 60) आणि मोनूनाथ जस्सानाथ (वय 20) हे रावेर तालुक्यात जडीबुटी विक्रीसाठी आले होते. मुजलवाडी गावात एका व्यक्तीला जडीबुटीची औषधे देत असताना काही स्थानिकांनी त्यांच्यावर मुलं चोरण्याच्या टोळीचा संशय घेतला. यानंतर जमावाने दोन्ही साधूंना मारहाण सुरू केली. घाबरलेल्या साधूंनी आपल्या चारचाकी गाडीतून पळ काढला, परंतु लोहारा आणि कुसुंबा परिसरात जमावाने त्यांचा पाठलाग करत पुन्हा पकडले आणि जोरदार मारहाण केली. यात दोन्ही साधू जखमी झाले, तसेच त्यांची गाडीही फोडण्यात आली. पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल आणि सावदा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी साधूंना जमावाच्या तावडीतून सोडवले. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, इकबाल मोहम्मद तडवी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शेतवस्ती, वाड्या किंवा गावांमध्ये येणाऱ्या अपरिचित व्यक्ती, भटके, साधूवेशातील संशयित किंवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांवर परस्प, हल्ला करू नये. कोणावर संशय आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे. अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.