Jalna News : धक्कादायक ! जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना खेळाडूचा हार्ट अटॅकने मृत्यू

जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ली हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण वाढले आहे. जालन्यामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विजय पटेल असे मृत पावलेल्या खेळाडूचे नाव आहे. जालना शहरातील फ्रेजर बॉईजच्या मैदानावर सामना सुरू होता. नेहमीप्रमाणे खेळ सुरू असताना विजय पटेल बॅटिंगसाठी आला. सामना सुरू असाताना विजयला अस्वस्थ वाटू लागलं. क्रिकेट खेळत असताना अचानक त्याला हार्ट अटॅक आला. पार्टनरसोबत रणनिती तयार केल्यानंतर स्ट्राईकच्या दिशेने जाताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो खाली बसला. यानंतर तो मैदानावर कोसळला.
यानंतर तातडीने संघातील खेळाडूंनी त्याच्या दिशेने धाव घेतली अन् त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात भरती केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.





