नवी दिल्ली – उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने काल सहारणपूर येथे एका दहशतवाद्याला अटक केली. तो जैश ए मोहम्मद आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. मोहम्मद नदीम असे त्याचे नाव असून या दोन संघटनांच्या तो थेट संपर्कात होता. भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती, अशी माहिती उघड झाली आहे. आत्मघाती हल्ल्याचीही त्याची योजना होती व त्याच्या मोबाइलमधून महत्वाची माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. नदीम विशेष प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला बोलावण्यात आले होते. तो अफगाणिस्तानातही जाणार होता.