रिओ डी जनेरिओ (ब्राझील) : देशाविरोधात बंड पुकारण्याचा खटला म्हणजे आपल्याविरोधात सूडबुद्धीने करण्यात येत असलेले राजकारण असल्याचा आरोप ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांनी केला आहे. बोल्सेनारो यांनी २०२२ मध्ये सत्ता कायम राखण्यासाठी देशाविरोधात बंड केल्याच्या आरोपाखाली खटला सध्या सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी बोल्सेनारो यांच्या वकिलांनी हा आरोप केला. अध्यक्षीय निवडणुकांमध्ये नाव्या विचारांच्या विरोधकांकडून पराभूत झाल्यानंतर बोल्सेनारो यांच्या समर्थकांनी संसदेची इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या नंतर त्यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला. ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात बचाव पक्षाची बाजू मांडून झाल्यावर न्यायाधीशांच्या पॅनेलकडून मतदानाद्वारे निवाडा केला जाणार आहे. बोल्सेनारो यांना बंडखोरीच्या आरोपात दोषी ठरवले गेल्यास त्यांना १२ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्या आणि इतर आरोपांवर दोषी आढळल्यास अनेक दशके तुरुंगवास होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अध्यक्षपदाची पहिली टर्म संपल्यानंतर झालेल्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून पराभव झाल्यावर अशाच प्रकारे आपल्या कॅपिटल हिलमध्ये आपल्या समर्थकांना घुसवल्याचा आरोप होता. त्यावेळी त्यांनीही आपल्याविरोधात सूडबुद्धीने खटला दाखल केला गेल्याचा आरोप केला होता.