Jair Bolsonaro : ब्राझीलचे माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

साव पावलो (ब्राझील) : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्यावर २०२२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही पदावर राहण्यासाठी सत्तापालटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांनी त्यांच्या तीन खासदार पुत्रांद्वारे माहिती पसरवून त्यांच्यावर लादलेल्या सावधगिरीच्या उपायांचे उल्लंघन केले असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशादरम्यान म्हटले आहे. मात्र न्यायालयाच्या या आदेशांना वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे बोल्सेनारो यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याचे जाहीर केल्याशी बोल्सेनारो यांच्यावरील खटल्यालाचा संबंध जोडला जातो आहे. बोल्सेनारो यांच्यावरील खटला सूडबुद्धीने चालवला जात असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. त्या राजकीय आकसातूनच ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५० टक्के इतके भरमसाठ आयात शुल्क लावले असल्याची टीका होते आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरीस निवडणुकीत कॅपिटल हिलमध्ये घुसून जसा धुडगूस घातला होता, त्याच प्रमाणे बोल्सेनारो यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून संसद ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
कट्टर उजव्या विचारसरणीबाबत दोन्ही नेत्यांची एकमेकांशी तुलना केली जाते आहे. ब्राझीलच्या सरकारी वकिलांनी बोल्सोनारो यांच्यावर निवडणूक उलथवून टाकण्यासाठी एका गुन्हेगारी संघटनेचे नेतृत्व केल्याचा आरोप केला आहे. या कटाद्वारे २०२२ मध्ये बोल्सेनारो यांचा पुनर्निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लूला आणि न्यायमूर्ती डी मोरेस यांना ठार मारण्याच्या कटाचाही समावेश होता, असा आरोप आहे.





