Consumer rights : बिलात 50 पैसे जास्त घेणं रेस्टॉरंटला पडलं महागात; आता ग्राहकाला 10,000 रुपये द्यावे लागणार…
Consumer rights : जयपूरमध्ये रेस्टॉरंटने बिलात ५० पैसे जादा आकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने १० हजार रुपये नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च देण्याचे आदेश दिले. जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार.

Consumer rights : रेस्टॉरंट किंवा दुकानात बिलाचे पैसे देताना अनेकदा रकमेचे राऊंड ऑफ केले जाते. ५० पैशांऐवजी एक रुपया आकारला जातो. ग्राहकही फारसा विचार न करता पैसे देतात. मात्र, ग्राहकाच्या संमतीशिवाय बिलाची रक्कम वाढवणे जयपूरमधील एका रेस्टॉरंटला महागात पडले आहे. अवघ्या ५० पैशांच्या वादातून जिल्हा ग्राहक आयोगाने रेस्टॉरंटला ग्राहकाचे ५० पैसे परत करण्यासह ७ हजार रुपये नुकसानभरपाई आणि ३ हजार रुपये खटल्याचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
जयपूरमधील ५० वर्षीय व्यक्ती १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांना १,६४८ रुपये ५० पैशांचे बिल देण्यात आले. मात्र, रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ही रक्कम राऊंड ऑफ करून १,६४९ रुपये केली.
ग्राहकाने यावर आक्षेप घेतला. आपण यूपीआयद्वारे पैसे देत असल्याने ५० पैशांसह अचूक रक्कम भरता येऊ शकते, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, रेस्टॉरंटच्या नियमानुसार राऊंड ऑफ केलेली रक्कमच द्यावी लागेल, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला नाही, अशी तक्रारही ग्राहकाने केली.
ग्राहक आयोगात तक्रार दाखल –
रेस्टॉरंटने ग्राहकाच्या संमतीशिवाय बिलाची रक्कम वाढवली, असा आक्षेप घेत संबंधित व्यक्तीने जयपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. रेस्टॉरंटला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सुनावणीला रेस्टॉरंटचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आयोगाने एकतर्फी सुनावणी केली.
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात ग्राहकाच्या संमतीशिवाय बिलाची रक्कम वाढवणे हा अनुचित व्यापार व्यवहार असल्याचे आयोगाने नमूद केले. यासाठी आयोगाने राजस्थान राज्य ग्राहक आयोगाच्या यापूर्वीच्या एका निर्णयाचाही आधार घेतला.
रेस्टॉरंटला १० हजार रुपये द्यावे लागणार –
आयोगाने रेस्टॉरंटला ग्राहकाकडून जास्त घेतलेले ५० पैसे परत करण्याचे आदेश दिले. याशिवाय ग्राहकाला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी ७ हजार रुपये नुकसानभरपाई, तर खटल्याच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यास सांगितले. म्हणजेच रेस्टॉरंटला ५० पैशांच्या परताव्यासह एकूण १० हजार रुपये ५० पैसे द्यावे लागणार आहेत.
बिलात जादा पैसे आकारल्यास काय कराल?
या प्रकरणातून ग्राहकांना महत्त्वाचा धडा मिळतो. रेस्टॉरंट, किराणा दुकान किंवा अन्य ठिकाणी पैसे देताना बिलावरील अंतिम रक्कम तपासावी. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले असल्यास त्याबाबत विचारणा करावी. ग्राहकाच्या संमतीशिवाय किंवा योग्य माहिती न देता जादा पैसे आकारले जात असल्यास बिल आणि पेमेंटची पावती जतन करावी.
दुकानदार किंवा संबंधित आस्थापना तक्रारीचे निराकरण करत नसल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १९१५ या क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच consumerhelpline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल करता येते.





