प्रभात वृत्तसेवा पुणे – मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाउसच्या जमीनीचा विक्री व्यवहार (सेल डीड) तत्काळ रद्द करून न्याय द्यावा, अशी घोषणाबाजी करीत जैन समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी जैन समाज बांधवानी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना धारेवर धरले. येत्या १ नोव्हेंबर पूर्वी न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी तर या संदर्भात आरोप करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापू लागले आहे. त्यानंतर शनिवारी (दि.२५) पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग येथे जैन मुनींची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. जैन बोर्डिंगबाबत गेल्या काही दिवसांत अनेक गोष्टी घडत आहेत. माझा या जमीन विक्री प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. मात्र, काही मंडळी यात राजकारण करीत आहेत, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. पुणे शहराचा लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून जैन समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल. जैन समाजाला हवा त्या पध्दतीनेच प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची भूमिका मोहोळ यांनी मांडली. जैन मुनींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी मोहोळ बोलत असताना जैन समाजाचे बांधव आक्रमक झाल्याचे आढळून आले. जैन बोर्डिंग हाउसच्या जमीनीचा विक्री व्यवहार रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी मोहोळ यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. त्यावर मोहोळही भडकले व तत्काळ जैन बोर्डिंगमधून बाहेर पडले. न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच ठेवणार… जैन समाज बांधवाना न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यापूर्वी सेल डीड रद्द झालीच पाहिजे. जैन समाज बांधवांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार या सर्वांना आवाहनही केले आहे. त्यामुळेच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आमच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्याबाबतचे आश्वासन दिल्याची माहिती जैन मुनी गुरुदेव आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांनी माध्यमांना दिली. २९ ऑक्टोबरला संपूर्ण भारतातील जैन समाज बांधव एक दिवसीय उपोषण करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ट्र्स्टच्या विश्वस्तांनी अन्याय करण्याचे पाप कार्य बंद करावे. आगामी काळातही त्यांनी असे अन्यायकारक कार्य करू नये. देशातील सर्वच संस्थांच्या विश्वस्तांनी समाजाचा विश्वासघात होईल, असे कृत्य करु नये, असेही त्यांनी सांगितले.