Jailor 2 Box Office : बॅाक्स अॅाफिसवर जेलर 2 चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई
Jailor 2 Box Office : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जेलर २’ने भारतात पहिल्या दिवशी एकूण ७०.२५ कोटी रुपयांची कमाई केली. याउलट, रजनीकांत यांच्याच ‘कुली’ सिनेमाने पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचे सांगितले जाते.

Jailor 2 Box Office : सुपरस्टार रजनीकांत यांच्या २०२३ मधील ‘जेलर’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल ‘जेलर २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. या सिनेमाला भारतात पहिल्याच दिवशी तब्बल ७०.२५ कोटी रुपयाची ओपनिंग मिळाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जेलर २’ने भारतात पहिल्या दिवशी एकूण ७०.२५ कोटी रुपयांची कमाई केली. याउलट, रजनीकांत यांच्याच ‘कुली’ सिनेमाने पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरुवातीच्या कमाईच्या आकड्यांनुसार ‘जेलर २’ने ‘कुली’ला मागे टाकल्याचे चित्र आहे.
ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘जेलर २’ने पहिल्या दिवशी भारतात १६,५९९ शोजमधून ५९.७० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. भारतातील एकूण कमाई ७०.२५ कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. परदेशातील कमाई ५५ कोटी रुपये गृहीत धरल्यास सिनेमाचे जगभरातील एकूण कलेक्शन १२५.२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता विकेंडमध्ये हा सिनेमा आणखी मोठी कमाई करेल असे सांगितले जात आहे.
‘जेलर २’चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अनिरुद्ध रविचंद्रन यांनी सिनेमाला संगीत दिले असून, विजय कार्तिक कन्नन यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.
कलाकारांची मोठी फळी
या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत रम्या कृष्णन, एस. जे. सूर्या, मोहनलाल आणि सूरज वेंजारामूडू यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय, जॅकी श्रॉफ, विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती आणि हृतिक रोशन यांच्या कॅमिओ भूमिका उत्तम आहेत. सिनेमात रजनीकांत यांनी साकारलेली मुथुवेल पांडियन अर्थात ‘टायगर’ ही व्यक्तिरेखा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Dhruv Rathee: ‘ध्रुव राठीचा पासपोर्ट जप्त करा, निधीची चौकशी करावी…’ ; यूट्यूबरवर गंभीर आरोप





