Baramati : विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी जय पवार, रेवती सुळे
Baramati : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात, त्यांच्या आकांक्षांना बळ मिळावे, आधुनिक शैक्षणिक उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती : बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी जय पवार आणि रेवती सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे यांनी या निवडीची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते.
विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर जय पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि संस्थेचा शैक्षणिक वारसा पुढे नेणे, ही आपली जबाबदारी आहे. दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात, त्यांच्या आकांक्षांना बळ मिळावे, आधुनिक शैक्षणिक उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग राबविणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करणे, यावरही जय पवार यांनी भर दिला. विश्वस्त म्हणून मिळालेली जबाबदारी पार पाडताना अजित पवार यांनी जपलेले विकासविषयक विचार पुढे नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचा वटवृक्ष
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक, रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १६ ऑक्टोबर १९७२ रोजी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. शरद पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या संस्थेचा शैक्षणिक विस्तार गेल्या पाच दशकांत झाला आहे. बालविकास मंदिरापासून सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याचा विस्तार आज विविध शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण संस्थांपर्यंत झाला आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, विधी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये संस्था शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत आहे.





