110 कोटींच्या कर्जाबाबत अफरातफरी केल्याचा आरोप
नवी दिल्ली : मारुती उद्योग समुहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि कार्नेशन ऑटो इंडियाचे संचालक जगदीश खट्टर यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कार्नेशन ऑटो इंडिया कंपनी आणि इतर अन्य अज्ञात व्यक्तींनी मिळून कथित विश्वासघातचे गुन्हेगारी कारस्थान, फसवणूक आणि गुन्हेगारी गैरव्यवहार केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
पंजाब नॅशनल इंडिया कंपनीच्या, लार्ज कॉर्पोरेट बॅंच या दिल्लीतील टॉलस्टॉय हाऊस येथील शाखेचे मुख्य व्यवस्थापक के.एन.भारद्वाज यांनी 17 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही “एफआयआर’नोंदवण्यात आली आहे. जगदीश खट्टर हे व्यवस्थापकीय संचालक/अध्यक्ष/ हमीदार असलेल्या कंपनीने आणि त्यांच्याशी संबंधित खट्टर ऑटो इंडिया प्रा.लि., कार्नेशन रिऍल्टी प्रा.लि. आणि कार्नेशन इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीने मिळून 170 कोटी रुपयांच्या मुदत कर्जासाठी अर्ज केला होता. हे कर्ज 23 2009 मे रोजी मंजूर केले. कर्जदारांच्या विनंतीवरून कर्जाची रक्कम 10 कोटींनी वाढवण्यात आली. मात्र नंतर ही रक्कम 110 कोटींवरच मर्यादित ठेवली गेली, असे “एफआयआर’मध्ये म्हटले आहे.
जगदीश खट्टर आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांकडून 110 कोटींच्या कर्जाची परतफेडही झाली नाही. उलट या कंपन्यांनी 30 जून 2012 पासून दिवाळखोरी झाल्याची घोषणा 30 सप्टेंबर 2015 रोजी केली.
कर्ज घेतलेल्या कंपन्यांनी बॅंकेच्या परवानगी शिवाय गहाण ठेवलेली मालमत्ता विकून टाकली. विक्रीनंतर मिळालेली रक्कम अन्यत्र वळवली. यामुळे बॅंकेचा विश्वासघात केला आणि आर्थिक फसवणूक केल्याचे “एफआयआर’मध्ये म्हटले आहे.