Jagdeep Dhankhar | भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडत असल्याचे म्हणत राजीनामा दिला. आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे’, असं म्हटलं आहे. धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती कोण असेल? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. Jagdeep Dhankhar | उपराष्ट्रपती पदासाठी राजनाथ सिंह, नितीश कुमार, हरिवंश नारायण सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा यांच्याही नावाची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या चर्चामध्ये शशी थरूर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया कशी पार पडते, ते जाणून घेऊयात…. Jagdeep Dhankhar | भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्यावर राज्यसभेचे कामकाज पार पाडण्याची आणि कायदे बनविण्याची जबाबदारी असते. जर काही कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे त्यांची जबाबदारी सांभाळतात. उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे उपसभापती किंवा भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य राज्यसभेचं कामकाज पाहू शकतात. उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला 15,000 रुपयांचे डिपॉझिट भरावे लागते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसे होते? उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. यात नामांकित सदस्यांचाही समावेश असतो. राज्यसभेचे 245 खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार भाग घेतात. यात राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित खासदारांचाही समावेश असतो. हे खासदार पसंती क्रमानुसार मतदान करतात. मतमोजणी कशी होते ? उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयासाठी एक निश्चित आकडा गाठावा लागतो. सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या दोनने भागली जाते आणि नंतर त्यात 1 जोडला जातो. 720 खासदारांनी मतदान केले तर त्याला 2 ने भागले जाते. उत्तर 360 मिळेल यात 1 जोडल्यानंतर 361 आकडा होईल जो निवडणूक जिंकण्यासाठी गाठावा लागतो. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. जर यात एखाद्या उमेदवाराला 361 पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी घोषित केले जाते. कलम 68 च्या कलम 2 नुसार, उपराष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा दिल्यामुळं आणि कोणात्याही कारणास्तव पदच्युत केल्यास उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते. त्यामुळे आता उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहेत. Jagdeep Dhankhar | हेही वाचा Ambadas Danve : महाराष्ट्रात रमीला राजमान्यता द्या, तातडीने अध्यादेश काढा; कोणी केली मागणी?