जीनपिंग यांनी बोलावलेल्या बैठकीला जॅक मा प्रकटले; चीनसह जगभरात ठरला चर्चेचा विषय

बीजिंग – चीनमध्ये लोक बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतात. जेव्हा एखादा प्रसिद्ध व्यक्ती तेथील कम्युनिस्ट सरकारच्या डोळ्यात खूपू लागतो तेव्हा तो अचानक एके दिवशी गायब होतो. अशाच प्रसिध्दीच्या झोतात आल्यानंतर अचानक गायब झालेल्यांमध्ये एक नाव होते जॅक मा यांचे. चिनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे बराच काळ चर्चेत राहिले. पण २०२० मध्ये एके दिवशी ते अचानक गायब झाले.
सरकारने त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. त्यानंतर म्हणजे २०२३ पासून ते क्वचित प्रसंगीच दिसतात. पण आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतः त्यांना भेटायला बोलावले होते व जॅक माही प्रकट झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.
१७ फेब्रुवारी रोजी चीनची राजधानी बीजिंगमध्ये जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक हाय प्रोफाइल बैठक झाली. जॅक मा यांच्यासह चीनमधील बड्या उद्योगपतींनी यात सहभाग घेतला. या बैठकीत शी जिनपिंग यांनी सर्व तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यास सांगितले आहे. अमेरिकेने जे ट्रेड वॉर सुरू केले आहे त्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक झाली असावी असे मानले जाते आहे. गेल्या काही काळात चीनची अर्थव्यवस्थाही फारशी चांगली नसल्याच्या बातम्या असतात.
त्यानंतर जीनपिंग यांनी बोलावलेल्या बैठकीला शाओमीचे संस्थापक आणि सीईओ लेई जून, टेन्सेंटचे संस्थापक पोनी मा हुआतेंग, इलेक्ट्रिक कार कंपनी बीवायडीचे अध्यक्ष वांग चुआनफू आणि हुआवेईचे प्रमुख रेन झेंगफेई हे देखील उपस्थित होते. शी जिनपिंग यांच्या बैठकीबद्दल फारशी माहिती उघड होऊ शकली नाही, परंतु सर्वात चर्चेचा विषय ठरला तो जॅक मा यांचे आगमन.
एक काळ असा होता जॅक मा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांचे अलिबाबा हे अमेझॉनचे प्रतिस्पर्धी मानले जात होते. २०१७ मध्ये त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. येथूनच जॅक मा यांच्या पतनाला सुरुवात झाली असे म्हटले जाते.
चिनी वेबसाइटवर त्यांच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले. त्यातच एके दिवशी जॅक मा यांनी चिनी बँकांवर टीका केली. मात्र त्यांची टीका सरकारला रूचली नाही. सरकारने ही आपल्यावरच टीका आहे अशा दृष्टीने त्याकडे पाहिले आणि त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर २०२० पासून जॅक मा जवळपास अज्ञातवासातच आहेत. याच कारणास्तव आता त्यांचे प्रकट होणे चर्चेचा विषय ठरला आहे.





