Manoj Jarange : एका मिनिटांत होतंय… जीआरसाठी आता वेळ देणार नाही, जरांगेंच्या युक्तिवादाने शिंदे समितीही निरूत्तर

Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत. त्यामुळे राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीने कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना शनिवारी केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले.
जरांगे यांच्या भेटीसाठी आलेल्या शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही, असे विधान केलं आहे.
यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, ‘येत्या शनिवार-रविवारच्या आत काही झाले नाही तर एकही मराठ्याचे लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही. अजून सहा सात दिवस हातात आहे. आणखी वेळ गेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असे जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावर शिंदे समितीने खूप अभ्यास केला आहे. या दोन गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे. यात वादच नाही. सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करा. औंध संस्थांन आणि बॉम्बे गव्हर्नेमेंटच्या गॅझेटला पंधरा वीस दिवस देऊ. पण हैद्राबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेट लागू करायला एक मिनिटही वेळ देणार नाही. 13 महिने दिले. , असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
एखादं गाव आहे, तिथं त्या काळी १०० लोकं दाखवले, नावं नाहीत, आडनावं नाही, पण आताचा मराठा जो आहे तो कुणबी आहे. गॅझेटमध्ये नावं नसली तरी त्याच गावातले १०० लोक होते हे तरी नक्की आहे. गॅझेटच मराठ्यांसाठी आहे. त्या गॅझेटमध्ये असलेला मराठा कुणबी आहे. जर तो कुणबी नसेल तर मग दुसरं कोण कुणबी आहे? , असेही जरांगे म्हणाले.
एखादा न्यायाधीश असेल आणि त्यांचा मुलगा न्यायाधीश झाला नाही तर त्याच्या वडिलांना न्यायाधीश म्हणायचं नाही का? मग जर एखाद्या कुणब्याच्या मुलाने शेती केली नाही तर तो कुणबी राहणार नाही का? तुम्हाला अटी घातल्यात तुम्ही बोलत नाहीयेत. पण सरकार जसं सांगतंय तसं तुम्हाला करावं लागतंय. जर शनिवार-रविवारच्या आत झालं नाही तर महाराष्ट्रातला सगळा मराठा येथे येईल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.





