ऐकावे ते नवलचं! अंत्यविधीची तयारी सुरु केली अन्…; १०३ वर्षांची आजीबाई मृत्यूच्या दाढेतून परतली

नागपूर : मृत्यू हा कुणालाच चुकलेला नाही. जो जन्मला येतो त्याला एक दिवस या जगाचा अखेचा निरोप घ्यावा लागतो. हे त्रिकालबाधीत सत्य आहे. मात्र, मृत्यूला चकवा देऊन पुन्हा परतणारे अनेकजण असतात. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधील चारगावत घडली आहे. १०३ वर्षांच्या आजी चक्क मृत्यूच्या दारातून परतल्या आहेत. ही घटना एखाद्या चित्रपटासारखी असून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
१०३ वर्ष वय असणाऱ्या आजीचे नाव गंगाबाई साखरे असून, गेल्या दोन वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. वाढते वय यामुळे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अचानक त्यांच्या शरीराची हालचाल थांबली. तसेच त्यांचा श्वासही थांबल्यासारखा कुटुंबीयांना वाटला. त्यानंतर घरच्यांना वाटले की आजी गेल्या आहेत. यानंतर गंगाबाई साखरे यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर साखरे कुटुंबातील नातेवाईक, गावातील लोकं घरी येण्यास सुरूवात झाली.
परंपरेनुसार अंत्यविधीच्या तयारीला सुरूवात झाली. पायाचे अंगठे बांधले गेले, नाकात कापूस घातला आणि काही वेळातच अंत्ययात्रा निघणार होता. पण शेवटचे दर्शन घेत असताना एका नातेवाईकाचं लक्ष गंगाबाईंच्या पायाकडे गेले. त्यांच्या पायाचं बोट हलत असल्याचे संबंधित नातेवाईकाला दिसले. सुरुवातीला हा भास असावा असे त्याला वाटले. मात्र काही वेळातच गंगाबाईंनी डोळे उघडले आणि श्वास घेण्यास सुरुवात केली. यानंतर सगळ्यांचा आश्चर्याचा मोठा धक्काच बसला.
योगायोग म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी आजीबाईंचा वाढदिवस देखील होता. १३ जानेवारीला सोमवारी ही घटना घडली. ज्या दिवशी अंत्यविधीसाठी तयारी झाली त्याच दिवशी आजीबाई मृत्यूच्या दाढेतून परतल्या. त्यांनी १०३ वर्षांतून आता १०४ वर्षांत पदार्पण केले आहे. आजी जिवंत झाल्याचा आनंद कुटुंबीयांसाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा आहे.
अन् केक कापला
अंत्यविधीसाठी जमलेल्या सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन आजीचा वाढदिवस साजरा केला. एका हातात हार घेण्याऐवजी आजीच्या हातून केक कापण्यात आला. ही अनोखी घटना चारगाव परिसरासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : Nupur Stebin: नववधू नूपुर सेननचा रॉयल अंदाज; रिसेप्शनमध्ये स्टेबिन बेनसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय





