“राष्ट्रवादीनेच नातेवाइकांना ठेके देऊन पोसले’

पिंपरी -गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात शहरात जेवढी विकास कामे झाली नाहीत तेवढी भाजपने पाच वर्षांत केली आहेत. भाजपने विकास कामांचा अनुशेष भरून काढला आहे. आरक्षणे आणि डीपी रस्त्यांची 80 ते 90 टक्के कामे भाजपने केली आहेत. भाजपवर राष्ट्रवादीकडून जे भ्रष्टाचाराचे आरोप होतायत ते बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनीच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. राष्ट्रवादीने त्यांची सत्ता असताना आपल्या नातेवाइकांना ठेके देऊन पोसले आहे, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आरोप केले आहेत.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी पवार आणि भाजपचे शहर पदाधिकारी आले होते. त्या वेळी पवार यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. या वेळी एकनाथ पवार पुढे म्हणाले, भाजपने जे काही शहरात काम केले आहे, त्याला बोट दाखविण्याचे राष्ट्रवादीची मंडळी काम करत आहेत.
भाजपने शहराला विकासाच्या दिशेने नेले आहे. निवडणुका आल्यामुळे ही मंडळी आरोप करत असून त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. निवडणुका आल्या म्हणून भाजप कधीच तयारी सुरू करत नाही तर भाजप प्रत्येक निवडणुकीसाठी मैदानात तयार असते. भाजपच्या पाच वर्षांच्या कामावर शहरातील जनता समाधानी आहे. याचे उत्तर म्हणून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप शहर पातळीवर स्वबळावर लढणार असून, शिंदे गटाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील युतीबाबत निर्णय घेतील,
असेही पवार म्हणाले.





