हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले, त्यांचे रक्षण ही आमची जबाबदारी – नीतेश राणे

चिपळूण: महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा मोठा वाटा आहे. इतर धर्मीयांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रक्षाबंधनानिमित्त आयोजित राखी संकलन कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदू समाजाची सेवा आणि संरक्षण आमचे कर्तव्य-
नीतेश राणे म्हणाले, “राज्यातील महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाने पाठिंबा दिला. इतर धर्मीयांनी मतदानात साथ दिली नाही. तुम्ही मोहल्ल्यात फिरलात, तरी त्यांचे मत मिळाले नाही. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले आहे. त्यामुळे त्यांची सेवा करणे आणि त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.”
महिला सुरक्षित नसतील, तर विकासाला अर्थ नाही-
महिलांच्या सुरक्षेवर भर देताना राणे म्हणाले, “केवळ विकास साधला म्हणून उपयोग नाही. आपल्या राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला अर्थ नाही. लव्ह जिहादसारख्या घटना घडताना दिसतात, तेव्हा हिंदुत्ववादी सरकारची गरज का आहे, हे लक्षात येते. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक आहे.”
राखी संकलनामुळे हिंदुत्व अधिक मजबूत होईल-
राखी संकलन उपक्रमाचे महत्त्व विशद करताना राणे म्हणाले, “जिहादच्या नावाखाली आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते. राखी संकलन हा त्याला उत्तर आहे. आज १४ हजार राख्या संकलित करून त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या गेल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल.”
लव्ह जिहादला एकजुटीने उत्तर द्या-
लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना राणे म्हणाले, “रत्नागिरीसह गावागावांत लव्ह जिहादचे प्रकार घडत आहेत. याला एकच उत्तर आहे, आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. कोणीही आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला जागेवर ठेवणार नाही, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी.”
मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व भक्कम-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना राणे म्हणाले, “फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना प्रत्येक महिलेला आपला भाऊ तिचे रक्षण करत आहे, अशी भावना आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कोणीही लव्ह जिहादसारखे कृत्य करू शकत नाही किंवा आपल्या भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.”
कार्यकर्त्यांचा उपयोग ताकद वाढवण्यासाठी-
राणे यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “सरकार आणणे हे कार्यकर्त्यांचे काम आहे. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला पदे मिळाली असून, ती कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी वापरली जातील.” या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





