पिंपरी | जगणे तर सोडा येथे मरणेही झाले मुश्किल

किवळे, {उमेश ओव्हाळ} – सरणावर जाता जाता इतकेच कळले होते । मरनाने केली सुटका जगण्याने छळले होते ॥ या काव्यपंक्ती देहूरोड स्मशान भूमीकडे पाहिल्यावर तंतोतंत खऱ्या ठरतात. देहूरोडला मुस्लिम दफन भूमी, हिंदू स्मशानभूमी आणि ख्रिश्चन दफनभूमी या तीन वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. तिन्ही समाजांनी या जणू काही ताब्यात घेतल्या आहेत. यांच्या व्यतिरिक्त कोणी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला तर त्याला अडवले जाते. म्हणून अन्य जातीचे लोक मृतदेह हिंदू स्मशानभूमी आणि ख्रिश्चन दफनभूमी यांच्या मधोमध अंत्यसंस्कार करतात.
फासेपारधी समाजाचे लोक डोंगराच्या पायथ्याला मुस्लिम दफनभूमीच्या शेजारी मृतदेह अंत्यसंस्कार करतात. हेही नसे थोडके म्हणून गुरव समाजाचे लोक शितळानगर येथील दीपक आईस फॅक्टरी समोर मृतदेहांची विल्हेवाट लावतात. मृत झालेला माणूस आहे आणि या माणसाला योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावली पाहिजे एवढे साधे गणित या लोकांना कळू नये ही शोकांतिका आहे.
हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या समाज संस्था या ठिकाणी कार्य करतात. या संस्थांचे प्रमुखांना विचारले असता गोलमाल उत्तरे दिली जातात. येथे येण्यापासून आम्ही कोणालाही अडवत नाही, असे धडधडीत सांगतात. मात्र प्रत्यक्षात ही अडवणूक होत असते.
दोन स्मशानभूमीच्या मधोमध तिसरी स्मशानभूमी
या ठिकाणी हिंदू आणि ख्रिश्चन दफनभूमीच्या शेजारी अगदी मधोमध मृतदेहांच्या अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे. येथे लक्ष ठेवण्यास कोणीही नसल्याने मृतदेह उन्हाळून बाहेर पडतात. येथे लागोपाठ दोन वेळा दोन मृतदेह बाहेर आले होते. कुत्रे अथवा श्वापदे हे मृतदेह उकरून बाहेर काढतात.





