चेन्नई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसरा कार्यकाळ मिळणार आहे. त्यावरून ते स्वत:ची तुलना देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्याशी करत आहेत. मात्र, तशी तुलना आम्हाला अमान्य आहे. जनताही तशाप्रकारची तुलना नाकारेल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी शुक्रवारी म्हटले. सलग तिसरा कार्यकाळ मिळवण्याच्या नेहरूंच्या विक्रमाशी मोदींनी बरोबरी केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वत: मोदी यांनी ती बाब अधोरेखित केली. देशात १९६२ या वर्षानंतर प्रथमच सरकारला सलग तिसरा कार्यकाळ लाभेल, असे ते म्हणाले. त्यावर चिदंबरम यांनी चेन्नईत पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला २०१४ या वर्षी २८२, तर २०१९ मध्ये ३०३ जागा मिळाल्या. यावेळी त्या पक्षाला २४० जागांपर्यंतच पोहचता आले. त्याउलट, नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने अनुक्रमे ३६१, ३७४ आणि ३६४ जागांपर्यंत मजल मारली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजांविषयी चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या अंदाजांमधून जनतेला मूर्ख बनवण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक निकालामुळे ते अंदाज खोटे ठरले. मतदारांचे मत जाणून घेण्यासाठी कुणीच मतदान केंद्रांबाहेर थांबले नाही. मात्र, अचानकपणे भाजप ३५० किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकेल असे दावे करण्यात आले. त्या आकड्यांपर्यंत चाचण्या कशा काय पोहचल्या? एका ठिकाणी ते आकडे उत्पन्न करून इतरत्र वितरित करण्यात आले, अशी खिल्ली त्यांनी उडवली.