Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच ‘गर्जना’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा…
Uddhav Thackeray : यंदाही उबाठा पक्षाला काही अटींसह परवानगी देण्यात आली

Uddhav Thackeray: यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा घेण्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना उबाठा पक्षाचा दसरा मेळावा येथे होईल. येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उबाठा आणि शिवसेनेचे दोन वेगवेगळे मेळावे होतात. दसरा मेळावा हा राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाचा मानला जातो. यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी फक्त शिवसेना उबाठा पक्षाने अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाव्यतिरिक्त एकाही राजकीय पक्षाचा अर्ज महापालिकेकडे सादर झाला नाही. २०२२मध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अर्ज केला होता.
तर शिवसेना उबाठा पक्षानेही अर्ज केल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी उबाठा पक्षाला मिळाली होती. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथे शिवसेनेचा मेळावा होऊ लागला. शिंदेंच्या शिवसेनेने गेल्या वर्षी दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेतला, तर शिवसेना उबाठा पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच झाला. यंदाही उबाठा पक्षाला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे.
काही अटींसह परवानगी
रात्री १० वाजेपर्यंत सभा घेण्यात यावी. मैदानाचे नुकसान किंवा अटींचे उल्लंघन झाल्यास २० हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करणे. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र सादर करणे. मैदानाबाहेर आवाज जाणार नाही याची दक्षता घेण्याचे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माती मैदानात टाकता येणार नाही, अशा अटी घातल्या आहेत.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे अनेक ठिकाणी हजेरी लावलेली असताना आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. यावेळी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया, एमपीएससी परीक्षा, मुंबईतील मोकळ्या भूखंडांच्या आरक्षणातील बदल या मुद्द्यावरुन मेळाव्यात ठाकरे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा:






