पुणे जिल्हा | मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांची

लोणी काळभोर, (वार्ताहर) -कोणताही पालक मुलांना व्यसने करायला सांगत नाही; मात्र मुले ही आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे अनुकरण करतात. मुलांना चांगल्या किंवा वाईट गोष्टींची जाण नसते. जर एखादा पालक धुम्रपान करीत असेल तर मुलगा धुम्रपान करायला शिकतो.
पालक मोबाईल खेळत असतील तर त्याला मोबाईलचे व्यसन लागते. त्यामुळे मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकांची आहे असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात लोणी काळभोर पोलीस ठाणे व येरवडा येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख बोलत होते. यावेळी प्राचार्य सीताराम गवळी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे निशिकांत प्रधान, अनंत राम दरवेश, हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, शिक्षिका शर्मिला साळुंखे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, व्यसन हा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. हा गुंतागुंतीचा व जन्मभराचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते.
व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ती ओढ निर्माण होण्याची कारणे समजल्यास त्यावर मात करून माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे उज्ज्वल भवितव्य आहे. देशाचे भवितव्य हे व्यसनांमध्ये गुरफटलेले नसावे. तर वाचन, खेळ व अभ्यासामध्ये गुंतलेले असावे.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे निशिकांत प्रधान व अनंत राम दरवेश यांनी मुक्तांगणची उपचार पद्धतीवर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मी व्यसनमुक्त राहील अशी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद जानराव यांनी तर पर्यवेक्षिका रेखा पाटील यांनी आभार मानले.





