“मनसे’च्या पाठपुराव्यामुळेच पालिकेत दररोज राष्ट्रगीत – पटेकर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत दररोज राष्ट्रगीत सुरू होण्यासाठी आपण तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत पाटील यांनी महापालिकेत दररोज राष्ट्रगीत सुरू केले. दररोज राष्ट्रगीत सुरू करणारी राज्यातील पहिली पिंपरी चिंचवड महापालिका असल्याचेही पटेकर म्हणाले. राष्ट्रगीतामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक भावना आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, हा यामागील उद्देश होता. या निर्णयाचे शहरातून नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत असल्याचे शहर मनसेचे सचिव आणि मनसेचे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांनी सांगितले.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी मनसेचे पदाधिकारी आले होते. त्या वेळी शहर मनसेचे सचिव आणि मनसेचे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला.
या वेळी मनसेचे पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, उपविभाग अध्यक्ष नितीन चव्हाण, नीलेश नेटके उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार की युती करून याबाबत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतली. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. आगामी पालिका निवडणुकीत मनसे शहरात नगरसेवकांची दोन अंकी संख्या निश्चित गाठेल, असा विश्वासही पटेकर यांनी व्यक्त केला.





