बाबू गेनू यांची माहिती स्मारकात लावणे भूषणावह

शिवाजीराव आढळराव पाटील ः महाळुंगे पडवळ येथे उपोषणाची सांगता
मंचर (प्रतिनिधी) – महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारकात फोटो आणि दुर्मिळ ठेवा यांची माहिती स्मारकात लावणे भूषणावह असून त्यामध्ये आक्षेपार्ह काही नाही. कुणाच्या दबावाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बळी पडु नये. नियमाने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. 14) केले, तसेच त्यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.
महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारकात हुतात्माबाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे प्रा. वसंतराव भालेराव यांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्याविषयी दुर्मिळ माहिती असणाऱ्या फ्रेम्स तहसीलदार रमा जोशी यांच्या लेखी आदेशानंतर लावण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तहसीलदार यांनी फोटो फ्रेम्स आणि दुर्मिळ माहिती काढून ठेवण्याची कार्यवाही केली. या प्रकाराने हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, प्रा.वसंतराव भालेराव, हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे मारुती कुशाबा सैद, कविता शेटे हे गुरुवारी (दि. 12) उपोषणास बसले. शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, रवींद्र करंजखेले, सुनिल बाणखेले, धनेश मोरडे, सचिन बांगर, सागर काजळे, शिवा राजगुरू इत्यादी मान्यवर उपोषणस्थळी येऊन उपोषण कर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हुतात्मा बाबू गेनू यांची दुर्मिळ माहितीचा ठेवा आणि फ्रेम्स लावण्यासाठी जिल्हा अधिकारी पुणे यांच्या सोबत चर्चा केली जाईल, असे
आश्वासन दिले.
यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना सरबत देऊन सांगता करण्यात आली. हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर म्हणाले, येत्या दहा दिवसात स्मारकात पुन्हा फ्रेम्स, दुर्मिळ माहितीचे फोटो लावले नाहीतर तहसीलदार कार्यालय घोडेगाव येथे कोणास काही न सांगता आत्मदहन केले जाईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रश्नांची जबाबदारी प्रशासनाची राहिल.





