भ्रष्टाचाराचे आरोप करायला अक्कल लागत नाही : खा. उदयनराजे भोसले

सातारा – जो विकासकामे करतो, त्यालाच ठेचा लागतात. काही जण काहीच करत नाहीत आणि नुसतेच भ्रष्टाचाराचे आरोप करतात. असे आरोप करायला फार अक्कल लागत नाही, असा सणसणीत टोला खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला.
साताऱ्यातील विकासकामांवरून दोन्ही राजांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा संपायला तयार नाही. साताऱ्यात करंजे आणि राधिका रोडवरील कर्मवीर कॉलनी येथे विविध विकासकामांचे नारळ खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फोडण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेचा समाचार घेतला.
उदयनराजे म्हणाले, त्यांच्याकडे इतकी वर्ष सत्ता होती, मग त्यावेळी विकासकामे का झाली नाहीत? त्यांनी विकासकामे केली नाहीत आणि आम्हीच भ्रष्टाचार केल्याचा कांगावा ते करत आहेत. आम्ही साताऱ्यात ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, पुरेसे स्वच्छ पाणी आणि सातारा विकास आघाडीच्या वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केली आहेत.
त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा आरोप करण्याशिवाय काहीही काम उरलेले नाही. आमच्याकडून भ्रष्टाचार झाला असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. आम्ही कोठे चुकलो, ते दाखवून द्यावे. ज्यांची बुद्धी संकुचित असते, त्यांनाच असले उद्योग सुचतात. त्यांच्याकडे बरीच वर्ष अनेक सत्तास्थाने होती. तेव्हा त्यांनी साताऱ्याचा कोणता विकास केला? आम्ही विविध विकासकामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी आणला आहे. त्यांच्या कामाची तिथे पोहोच नसल्याने, ते केवळ आरोप करू शकतात. अशा आरोपांमुळे त्यांची बुद्धी अत्यंत संकुचित असल्याचे दिसून येते. केवळ आरोपच होत असतील, तर त्याचा उपयोग नाही. लोकांची कामे करून, आपला ठसा उमटवायचा असतो. विनाकारण आरोप करायला फारशी अक्कल लागत नाही.





