Chetan Dalvi : ‘लोक मला विसरले आहेत, याचं मनापासून दुःख होतं.’; ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवींनी व्यक्त केली खंत
Chetan Dalvi : तब्बल सहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी प्रकृतीवर मात केली. मात्र, या काळात इंडस्ट्रीतील अनेकांनी साधी विचारपूसही केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Chetan Dalvi : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, आजारपण आणि इंडस्ट्रीकडून मिळालेल्या उपेक्षेबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मन मोकळं केलं आहे. ब्रेन स्ट्रोकमधून सावरल्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘पती सगळे उचापती’, ‘टूरटूर’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधून तसेच ‘हमाल दे धमाल’, ‘फेका फेकी’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे चेतन दळवी काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनयापासून दूर गेले होते. तब्बल सहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी प्रकृतीवर मात केली. मात्र, या काळात इंडस्ट्रीतील अनेकांनी साधी विचारपूसही केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चेतन दळवी म्हणाले, “ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलं, ज्यांना आपली माणसं मानलं, त्यांनी आजारपणात विचारपूसही केली नाही. आता मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा कामासाठी तयार आहे, पण अनेक जण मला ओळखायलाही तयार नाहीत. लोक मला विसरले आहेत, याचं मनापासून दुःख होतं.”
इंडस्ट्रीत काही मोजकीच माणसं आपुलकीने विचारपूस करायची. मात्र, तीही आता या जगात नसल्याचं सांगताना त्यांनी दिवंगत अभिनेते रवींद्र बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढली.
“या क्षेत्रात काम थांबलं की ओळखही हळूहळू पुसट होत जाते. दिवस बदलले की अनेक जण ओळखही दाखवत नाहीत. अशावेळी स्वतःलाच समजावून घ्यावं लागतं,” असंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, “चेतन दळवी आता काम करत नाहीत किंवा ते व्यस्त असतील, असा समज काही लोक स्वतः करून घेतात आणि इतरांनाही तसंच सांगतात. त्यामुळे अनेक कामं माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
प्रकृतीवर यशस्वीपणे मात केल्यानंतर आता पुन्हा अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याची इच्छा चेतन दळवींनी व्यक्त केली असून, चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.





