Fathers Day 2026: एका मुलीच्या भावनेतून झाली सुरुवात; जाणून घ्या वडिलांच्या सन्मानाच्या या खास दिवसाची कहाणी
Fathers Day 2026 भारत, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक आपल्या वडिलांचे आभार मानतात, त्यांच्यासोबत वेळ घालवतात आणि त्यांच्या आयुष्यातील योगदानाचा सन्मान करतात.

Fathers Day 2026: आईच्या प्रेमाची चर्चा नेहमीच होते, पण वडिलांचे त्याग, संघर्ष आणि समर्पणही तितकेच मोठे असतात. कुटुंबासाठी आयुष्यभर मेहनत करणाऱ्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. २०२६ मध्ये हा दिवस २१ जून, रविवारी साजरा केला जाणार आहे.
भारत, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक आपल्या वडिलांचे आभार मानतात, त्यांच्यासोबत वेळ घालवतात आणि त्यांच्या आयुष्यातील योगदानाचा सन्मान करतात.
मात्र, अनेकांना या दिवसामागची खरी आणि भावनिक कहाणी माहिती नसते. विशेष म्हणजे, फादर्स डेची सुरुवात कोणत्याही सरकारने किंवा मोठ्या संस्थेने केलेली नव्हती. एका मुलीने आपल्या वडिलांबद्दल असलेल्या आदरातून या दिवसाची सुरुवात केली होती.
एका मुलीच्या मनात जन्माला आली कल्पना (Fathers Day 2026)
फादर्स डेची संकल्पना अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात राहणाऱ्या सोनोरा स्मार्ट डॉड यांनी मांडली होती. १९०९ मध्ये मदर्स डेच्या कार्यक्रमादरम्यान चर्चमध्ये प्रवचन ऐकत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. जसं आईंच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो, तसंच वडिलांसाठीही एक खास दिवस असायला हवा, असं त्यांना वाटलं.
वडिलांच्या संघर्षाने दिली प्रेरणा (Fathers Day 2026)
सोनोराच्या आईचं निधन तिच्या सहाव्या भावंडाच्या जन्मावेळी झालं होतं. त्यानंतर तिचे वडील विल्यम जॅक्सन स्मार्ट यांनी एकट्याने सहा मुलांचा सांभाळ केला. त्यांनी मुलांचं संगोपन, शिक्षण आणि भविष्य घडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या त्याग, मेहनत आणि प्रेमामुळे प्रेरित होऊन सोनोराने वडिलांच्या सन्मानार्थ एक विशेष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
Father’s Day
पहिला फादर्स डे कधी साजरा झाला?
सोनोराच्या प्रयत्नांनंतर १९ जून १९१० रोजी अमेरिकेतील स्पोकेन शहरात पहिला अधिकृत फादर्स डे साजरा करण्यात आला. त्यानंतर हळूहळू ही परंपरा अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये आणि नंतर जगभरातील अनेक देशांमध्ये पसरली.
राष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी लागली ६२ वर्षे
जरी फादर्स डेची सुरुवात १९१० मध्ये झाली होती, तरी त्याला अमेरिकेत अधिकृत राष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी तब्बल ६२ वर्षे लागली. अखेर १९७२ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली.
फादर्स डे का महत्त्वाचा आहे?
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण वडिलांच्या भावना, त्याग आणि मेहनतीकडे दुर्लक्ष करतो. ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबासाठी आयुष्यभर मेहनत करत असतात. फादर्स डे हा केवळ भेटवस्तू देण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या प्रेमाची, कष्टांची आणि योगदानाची जाणीव करून देण्याचा दिवस आहे.
या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांचे आभार मानणं आणि त्यांना आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती असल्याची जाणीव करून देणं हेच खरं सेलिब्रेशन ठरू शकतं.





