ISRO : इस्रोचे तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी उपयुक्त; पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा
भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासाच्या केंद्रस्थानी असलेल्या इस्रोने (ISRO) आपल्या उत्कृष्ट कामगिरी आणि किफायतशीर मोहिमांमुळे जागतिक स्तरावर यश मिळविले आहे.

ISRO : भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासाच्या केंद्रस्थानी असलेल्या इस्रोने (ISRO) आपल्या उत्कृष्ट कामगिरी आणि किफायतशीर मोहिमांमुळे जागतिक स्तरावर यश मिळविले आहे. इस्रोचे तंत्रज्ञान आणि भागीदारी केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोची प्रशंसा केली.
पॅरिसमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इस्रो आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. इस्रोच्या (ISRO) उत्पादन आणि ऑपरेशनल कार्यांचे खासगी संस्थांकडे हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावाबाबत इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांनी अध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर काही दिवसांतच पंतप्रधानांनी हे प्रतिपादन केले. या संघटनांनी इस्रोच्या भविष्यातील भूमिकेबद्दल तसेच कार्यरत कर्मचारी आणि भविष्यातील भरतीवर होणाऱ्या परिणामांबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, इस्रोची क्षमता शेतकरी, मच्छिमार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि नेव्हिगेशन (मार्गक्रमण) यांसाठी उपयुक्त ठरत आहे;. तसेच ३४ देशांचे ४३० हून अधिक उपग्रह भारतीय रॉकेटद्वारे अंतराळात पाठवण्यात आले आहेत. या जागतिक विश्वासामागे भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्या अनेक पिढ्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रम आहेत. अहोरात्र काम करून त्यांनी प्रत्येक मोहिम आणि यशाद्वारे इस्रोची जागतिक प्रतिष्ठा निर्माण केली आहे. अंतराळ संशोधन करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताला अभिमानास्पद स्थान मिळवून दिले आहे, असे ते म्हणाले.
चांद्रयान-३ मुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश बनला आहे आणि आदित्य-एल१ सूर्याची गुपिते उलगडत आहे. भविष्याचा विचार करता आमचे उद्दिष्ट २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणे आणि २०४० पर्यंत एखाद्या भारतीयाला चंद्रावर पाठवणे हे आहे.
या सर्व प्रयत्नांमध्ये आमचे मार्गदर्शक तत्त्व स्पष्ट राहिले आहे: याचे फायदे संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी असेही नमूद केले की, इस्रोसोबतच (ISRO) भारताचे खासगी अंतराळ क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. उद्योजकतेची ऊर्जा इस्रोच्या उत्कृष्टतेशी जोडली जात आहे, असे ते म्हणाले.






