वेस्ट बँकेमध्ये इस्रायली स्थानिकांकडून १९ वर्षीय पॅलेस्टिनी-अमेरिकन युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. वेस्ट बँकेतल्या एका गावावर केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली स्थानिक आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्यावर या युवकाला गोळ्या घालून मारण्यात आले. मुखमास गावामध्ये बुधवारी इस्रायली स्थानिकांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. अन्य स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर इस्रायली सैनिक आले आणि त्यांनंतर इस्रायली सशस्त्र स्थानिकांनी नासराल्लाह अबू सियाम नावाच्या युवकाची हत्या केली आणि अन्य काही जणांना जखमी केले, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. इस्रायली सैनिकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पोडल्या आणि हातबॉम्ब फेकले, असेही काही जणांनी सांगितले. मात्र जमावाला पिटाळून लावण्यासाठी बळाचा वापर केल्याचे इस्रायली सैनिकांनी म्हटले आहे. इस्रायली स्थानिकांच्या गोळीबारात युवक ठार झाल्याच्या वृत्ताला पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. २०२६ पासून इस्रायली हल्ल्यात ठार झालेला तो पहिला पॅलेस्टिनी आहे, असे पॅलेस्टिनी ऍथोरिटीच्या वॉल ऍन्ड सेटलमेंट रेसिस्टन्स कमिशनने म्हटले आहे. मुखमास आणि आजूबाजूच्या परिसरावर इस्रायलचे नागरी आणि लष्करी नियंत्रण आहे. इस्रायली स्थानिकांकडून या भागातल्या पॅलेस्टिनींवर नेहमी हल्ले केले जात असतात. या भागातील बांधकामे बेकायदेशीर असल्याचा दावा करत जाळपोळ हिंसाचार केला जात असतो.