इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी प्रख्यात उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली आहे. रतन टाटा हे भारत आणि इस्रायल दरम्यानच्या मैत्रीचे चॅम्पियन होते, अशा शब्दांमध्ये नेतान्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रतन टाटा यांचे बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये नेतान्याहू यांनी रतन टाटा यांच्या भारत-इस्रायल दरम्यानच्या मैत्री संबंधांमध्ये दिलेले योगदान अधोरेखित केले आहे. मी स्वतः आणि इस्रायली नागरिक रतन नवल टाटा यांच्या निधनामुळे दुःखी आहोत. ते भारताचे अभिमान वाटावे असे सुपुत्र आणि भारत-इस्रायल दरम्यानच्या मैत्री संबंधांचेखरे चॅम्पियन होते, असे नेतान्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आपल्या भावना रतन टाटा यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवण्याची विनंती नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील केली आहे. गुरुवारी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी रतन टाटा यांना त्यांच्या देशाचे खरे मित्र म्हणून आदरांजली वाहिली. तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी शुक्रवारी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. भारत आणि फ्रान्समधील उद्योगांना बळकटी देण्याच्या टाटा यांचीया भूमिकेला अधोरेखित केले. तसेच नावीन्यपूर्ण आणि उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.





