जेरुसलेम : इस्रायलकडून गाझामधील व्यापक कारवाईदरम्यान अजिबात संयम दाखवला जाण्याची चिन्हे नाहीत. गाझा सिटीतील नागरिकांना तेथून निघून जाण्याचे सांगितल्यानंतर आता एक प्रमुख रुग्णालय रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. गाझा सिटीमध्ये अजूनही हजारो लोक अडकले असून इस्रायलच्या माऱ्यामध्ये गाझा सिटीतील बहुतेक अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. गाझा सिटीतील मुख्य रुग्णालय म्हणून ओळख असलेले जॉर्डानियन रुग्णालय रिकामे करण्याचे आदेश इस्रायली फौजांनी सोमवारी दिले, असे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. जॉर्डनियन रुग्णालय हे गाझा सिटीच्या अग्नेयेकडील ताल अल-हवा शहराशेजारचे मोठे रुग्णालय आहे. गाझा सिटीतील लोकांना इस्रायली फौजांनी यापुर्वीच मध्य आणि दक्षिण गाझाकडे निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालये वगळता सर्व मानवतावादी मदत केंद्रे देखील रिकामी करण्यात यावीत, असेही इस्रायली सैन्याने सर्व कर्मचाऱ्यांना खासगी निरोप पाठवून कळवले आहे. या वृत्तावरील प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता इस्राली सैन्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जॉर्डनियन रुग्णालयामध्ये किमान 300 रुग्ण उपचार घेत आहेत. तेथे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक देखील आहेत, असे गाझा आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक डॉ. मुनीर अल- बौश यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील डझनावारी कुटुंबे आपल्या घरातच अडकून पडली असताना इस्रायली सैन्य रुग्णालयाच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेचच हे रुग्णालय रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या वेळीच कारवाई तीव्र संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने जागतिक पातळीवरचे नेते न्यूयॉर्क येथे जमले असून अनेक देश पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याच्या तयारीत आहेत. इस्रायलने मंगळवारपासून सुरू केलेल्या व्यापक लष्करी मोहीमेमुळे युद्धबंदीसाठीचे सर्व प्रयत्न अडचणीत आले आहेत. ही मोहीम आता आगामी बरेच महिने सुरू राहणार असे दिसते आहे. पॅलेस्टाईनला फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर रविवारी संध्याकाळी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवरच्या भव्य स्क्रीनवर इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्हींच्या ध्वजांच्या प्रतिमा झळकावण्यात आल्या होत्या.