Israel-Iran War : इस्त्रायलच्या शेअर बाजारावर क्षेपणास्त्र हल्ला; तरीही निर्देशांक वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

तेलअविव : इराणने इस्रायलच्या शेअर बाजार इमारतीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. यामुळे इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र तरीही गुंतवणूकदारांनी इस्रायलमधील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केल्यामुळे इस्रायलच्या शेअर बाजाराचे निर्देशांक 52 आठवडयांच्या उच्चांकावर गेले. इस्रायललमधील मुख्य निर्देशांक टीए 125 हा 13 जून रोजी युद्ध सुरू झाल्यापासून पाच टक्क्यांनी वाढला आहे.
या निर्देशांकात मे महिन्यामध्ये 6.55% तर एप्रिल महिन्यामध्ये 4.53% वाढ झाली आहे. आजही या निर्देशांकात वाढ होऊन हा निर्देशांक 5,850 या 52 आठवड्याच्या उच्चाकी पातळीवर गेला. या शेअर बाजारातील इतर निर्देशांकही वाढीव पातळीवर आहेत. यामध्ये मुख्यतः स्थानिक गुंतवणूकदारांचे योगदान असल्याचे सांगितले जाते. या गुंतवणूकदारांनी लढाऊ बाणा स्वीकारून देशातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली.
दरम्यान इराणच्या इस्रायलमधील शेअर बाजार व इस्पितळावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवरील हल्ल्यात वाढ केली असल्याचे दिसून येते. आगामी काळात या हल्ल्यात आणि प्रति हल्ल्यात वाढ होत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकाही युद्धात उतरण्याची शक्यता वाढत चालली आहे.
जागतिक निर्देशांकावर परिणाम
इराणने इस्रायलच्या शेअर बाजारावर प्रत्यक्ष क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे इस्रायलच्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले असतानाच या युद्धामुळे गेल्या आठवड्यापासून अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराच्या निर्देशांकावर मात्र बर्याच प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला आहे. आजही युरोप, आशिया आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक युद्धामुळे नकारात्मक पातळीवर राहिले. मात्र इस्रायलच्या शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.





