Israel-Hamas war : इस्रायल गाझामध्ये 4 दिवस युद्ध थांबवणार ; हमास करणार 50 ओलिसांची सुटका

Israel-Hamas war : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धाला आता महिना उलटून गेला आहे मात्र तरीही हे युद्ध काही केल्या थांबताना दिसत नाहीत. त्यातच इस्रायल सरकारने बुधवारी सकाळी म्हणजे आज सकाळी चार दिवसांच्या युद्धविरामाला मंजुरी दिली. तर दुसरीकडे हमासने 239 पैकी 50 ओलिसांना मोबदल्यात सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.
बेंजामिन नेतन्याहू यांनी बोलावलेल्या बैठकीत या युध्दविरामाविषयी निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बोलताना, “आज आम्ही एक कठीण निर्णय घेतला आहे, परंतु तो योग्य निर्णय आहे,” असे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले. तर 50 ओलिसांची सुटका करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यातील या करारात कतारने महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र हे सुरु असताना दुसरीकडे इस्रायलमध्येच बेजमीन नेतान्याहू यांच्या निर्णयावर विरोध दर्शवण्यात येत आहे. विरोधकांनी सर्व ओलीसांची सुटका करण्याच्या इस्रायलच्या क्षमतेला हा निर्णय हानी पोहोचवेल आणि हमासला गाझामधून बाहेर काढण्यासाठी इस्रायलच्या लष्करी मोहिमेला गुंतागुंत करेल, एकदा युद्ध तात्पुरते थांबले की ते पुन्हा सुरू करणे कठीण होईल, असा इशाराही विरोधकांनी सरकारला दिला असल्याचे म्हटले जात आहे.
नेतन्याहू यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले, आयडीएफने करार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लढाई सुरू करण्याची योजना आखली आहे. तसेच “मला हे स्पष्ट करायचे आहे. आम्ही युद्धात आहोत आणि जोपर्यंत आम्ही आमचे सर्व उद्दिष्ट साध्य करण्यात, हमासचा नाश करण्यात आणि आमचे सर्व बंदिवान आणि बेपत्ता लोकांना परत मिळवण्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही युद्धातच राहू.” असे त्यांनी यावेळी म्हटले. नेतान्याहू म्हणाले, “आम्ही हे देखील करू. गाझामध्ये इस्रायलला धोका देणारी कोणतीही युनिट्स शिल्लक राहणार नाहीत याची खात्री करा.”असे म्हणत त्यांनी विरोधकांना विश्वास दिला.





